सर्व तुरंबव ग्रामस्थ बंधू भगिनी,
सप्रेम नमस्कार,
कोकणवासीयांचा अत्यंत आवडता आणि श्रद्धेचा गणपती उत्सव आता अगदी जवळ आला आहे. सर्वांचीच आता गावी जाण्याची तयारी आणि लगबग चालू झाली असेल.
रेल्वे, बस, खाजगी वाहन अशा जमेल त्या, मिळेल त्या मार्गाने मुंबईकर कोकणातील आपापल्या गावी पोहोचतील. या प्रवासात रस्तामार्गे जाणाऱ्या मुंबईकरांना वर्षानुवर्षे येणारा सर्वात मोठा अडथळा म्हणजे अत्यंत दयनीय अवस्थेत असलेला मुंबई-गोवा महामार्ग. यावेळी कोकणाकडे जाणाऱ्या एका मर्गिकेचे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होईल असे जरी शासनाकडून सांगण्यात येत असले तरी जेमतेम एक आठवडा उरला असताना महामार्गाची सध्याची स्थिती पाहता याबाबत शंकाच आहे.
शनिवार दिनांक १६ सप्टेंबर ते सोमवार दिनांक १८ सप्टेंबर या तीन दिवसात बहुसंख्य मुंबई निवासी कोकणवासीय कोकणाकडे प्रयाण करतील.
वरील तीन दिवसांमध्ये आपले बरेच मुंबईकर ग्रामस्थ देखील तुरंबव येथे जाण्यासाठी या महामार्गावर प्रवास करतील. या काळात एकूणच महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनांची प्रचंड संख्या व महामार्गाची सध्याची स्थिती पाहता, विशेषतः खाजगी वाहनाने प्रवास करणाऱ्या आपल्या ग्रामस्थांना ट्रॅफिक, टायर पंक्चर, वाहनातील बिघाड इत्यादी अडचणी येण्याची शक्यता असते.
अशावेळी या ग्रामस्थांना उपयुक्त अशी माहिती पुढीलप्रमाणे पुरविण्याचा प्रयत्न आम्ही श्री शारदा समाज सेवा मंडळाच्या वतीने करणार आहोत.
१. महामार्गातील विविध टप्प्यांमधील महामार्गाच्या सद्यस्थितीची अद्ययावत माहिती
२. या काळात महामार्गावर मुंबई ते सावर्डे या दरम्यान असलेली ट्रॅफिकची परिस्थिती. ही माहिती, प्रवासात असलेले आपले ग्रामस्थ, आमच्या परिचयातील इतर मंडळी, प्रसारमाध्यमे इत्यादी मार्गे आम्हाला मिळेल. तसेच ही माहिती जास्तीत जास्त अद्ययावत (live) असावी हा आमचा प्रयत्न असेल
३. महामार्गावर प्रवासात असताना काही मदत लागल्यास शक्य होईल त्या त्या ठिकाणी मदतीसाठी काही संपर्क क्रमांक देण्याचा देखील आमचा प्रयत्न असेल.
यातील पहिला भाग म्हणून महामार्गाच्या अद्ययावत सद्यस्थितीची माहिती तसेच मदतीसाठी संपर्क क्रमांक (उपलब्धतेनुसार) देणारा मेसेज आम्ही शुक्रवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी पाठवू.
त्यानंतर १६ ते १८ सप्टेंबर दरम्यान महामार्गावरील विविध टप्प्यांमध्ये असलेली ट्रॅफिकची स्थिती तसेच इतर उपयुक्त माहिती आम्ही वेळोवेळी पाठवू.
हा प्रयत्न यशस्वी होण्यासाठी आम्हाला यात ग्रामस्थांकडून सक्रिय सहभागाची अपेक्षा आहे. या काळात जे ग्रामस्थ महामार्गावर प्रवास करत असतील त्यांनी विविध भागातील रस्त्यांची स्थिती, वाहन कोंडी, एखाद्या ठिकाणी अपघात झाल्याने ट्रॅफिक थांबवले आहे का, पोलिस बंदोबस्त आहे का, दुसरा एखादा पर्यायी मार्ग उपलब्ध आहे का इत्यादी माहिती आम्हाला व्हॉट्स ॲपवर पाठवल्यास अशी माहिती संकलित करून आम्ही ती ग्रुपवर पाठवू. त्याचा प्रवासात असलेल्या किंवा प्रवास सुरू करण्याच्या तयारीत असलेल्या ग्रामस्थांना उपयोग होईल. अशी माहिती आम्हाला कोणत्या व्हॉट्स ॲप क्रमांकावर पाठवावी याची माहिती आम्ही आमच्या १५ सप्टेंबर रोजीच्या मेसेज मध्ये देऊ.
आम्ही यावर्षी हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर राबवणार आहोत. याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व ही माहिती सर्वांना खरोखरच उपयुक्त होत आहे असे दिसल्यास यापुढील वर्षांत देखील आम्ही हा उपक्रम राबवू.
याबाबत आपल्या काही सूचना असल्यास माझ्या व्हॉट्स आप क्रमांक ९८६९१११४४४ वर जरूर कळवा.
माझ्या ११ सप्टेंबर २०२३ रोजीच्या मेसेजवर ग्रामस्थांकडून उत्साहवर्धक प्रतिक्रिया मिळाल्या तसेच काही उपयुक्त सूचनादेखील आल्या.
उपरोक्त मेसेजमध्ये नमूद केल्याप्रमाणे मुंबई-गोवा महामार्गावरील विविध टप्प्यांतील रस्त्याच्या स्थितीची माहिती पुढे देत आहे:
पनवेल ते वडखळ (३८ किमी):
मुंबई गोवा महामार्गाचा हा टप्पा पनवेल येथील पळस्पे येथून कर्नाळा, पेण वरून वडखळ येथे जातो.
या भागातील रस्त्याची स्थिती बरीचशी चांगली आहे. रस्त्याच्या बहुतांश भागाचे काँक्रिटीकरण झालेले आहे. परंतु काही ठिकाणी काँक्रिटीकरणाचे काम चालू आहे तिथे वारंवार डायव्हर्शन येतात. तसेच एकदोन ठिकाणी पुलांचे काम चालू आहे तिथे खालून जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे आहेत.
वडखळ ते नागोठणे (२२ किमी):
या भागातील रस्त्याची स्थिती फारशी चांगली नाही. वडखळ सोडल्यानंतर सुरुवातीचा काही भाग चांगला आहे. परंतु पुढे पुढे ही स्थिती बिघडत जाते व नागोठणे येण्यापूर्वीचा बराच भाग अत्यंत खराब आहे. काही भागात खड्डेच खड्डे आहेत त्यामुळे गाडी कमी वेगाने चालवावी लागते. तसेच काही भागात रस्ता चांगला असल्याने गाडीने वेग घेतल्यावर अचानक मध्येच खड्डे येतात व त्यामुळे गाडीला हादरे बसून नुकसान होऊ शकते. म्हणून या भागात गाडी काळजीपूर्वक चालवावी.
नागोठणे ते कोलाड (२१ किमी):
महामार्गावरील नागोठणे ते कोलाड हा बहुधा सर्वात खराब रस्ता आहे. अगदी थोडाच भाग व्यवस्थित व बाकी सर्व भागात खड्ड्यांचे साम्राज्य असेच चित्र दिसते. समाज माध्यमातून दिसणारी खड्ड्यांची बहुतेक छायाचित्रे/व्हिडिओ याच भागातील असतात. त्याशिवाय एकाच मार्गिकेवर दोन्ही बाजूने वाहने येत असल्याने हा भाग अधिकच धोकादायक आहे.
एकूणच येथील परिस्थिती दयनीय आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी काँक्रीटीकरण झालेली एक मार्गिका सुरू करणार या आश्वासनापासून वास्तव परिस्थिती किती दूर आहे हे या भागात आल्यावर स्पष्ट होते.
कोलाड ते माणगाव (२१ किमी):
या भागातील स्थिती वरील भागापेक्षा फारशी वेगळी नाही. मात्र चांगल्या रस्त्याचे प्रमाण थोडे जास्त आहे व खड्डे थोडे कमी आहेत.
परंतु या टप्प्यामध्ये इंदापूर व माणगाव येथील बाजारपेठेचा भाग येतो व तो बराच वर्दळीचा असतो. गणपतीच्या दिवसात येथे वाहतूक कोंडी होते असा अनुभव आहे. त्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त असतो. यावेळी पोलिस विशेष काळजी घेत आहेत असे कळते. बाजारपेठ भागातील हातगाड्या, रस्त्यावरील विक्रेते इत्यादींना मज्जाव, गाड्यांच्या पार्किंगसाठी वेगळी जागा मुक्रर, दोन्ही बाजूंच्या मार्गिका मध्ये तात्पुरते डीव्हायडर इत्यादी उपाय करून महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा ठेवण्याची योजना आहे. त्यामुळे वाहन चालकांनी देखील शिस्त पाळल्यास या भागात वाहतूक कोंडी होणे टळू शकते.
अन्यथा येथील वाहतूक कोंडी वरील उपाय म्हणून या दोन्ही ठिकाणी बाह्य वळणे (bye-pass) व्हायची आहेत. परंतु सद्यस्थिती पाहता ही दोन्ही बाह्य वळणे अजून तरी कागदावरच आहेत व ती प्रत्यक्षात यायला निदान एक वर्ष तरी लागेल असे वाटते.
एकूणच पनवेल ते माणगाव येथील महामार्गाची सध्याची स्थिती पाहता गावी जाताना हा भाग टाळावा हेच उत्तम. त्याऐवजी पनवेल-खोपोली-पाली- निजामपूर-माणगाव हा योग्य पर्याय आहे.
या पर्यायी मार्गाची माहिती पुढे देत आहोत:
पनवेल ते खोपोली/खालापूर (३३ किमी):
पनवेल वरून खोपोली/खालापूर येथे, एकतर मुंबई-पुणे जुन्या महामार्गाने किंवा मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाने जाऊ शकता. द्रुतगती महामार्गाने गेल्यास प्रवास वेगवान होईल पण ₹.२४०/- एवढा टोल भरावा लागेल. दरवर्षी प्रमाणे शासनाने या दिवसात टोलमाफी दिल्यास पोलिसांकडून आवश्यक तो पास घेऊन टोलमाफीचा लाभ घेता येईल.
खोपोली/पाली (३६ किमी):
खोपोली-पाली बायपास रस्ता आता अत्यंत चांगल्या स्थितीत आहेत. बऱ्याचशा भागाचे काँक्रीटीकरण झाले आहे. राहिलेल्या भागात डांबरी रस्ता सुस्थितीत आहे. त्यामुळे आपण विनासायास पालीपर्यंत पोहोचू शकता.
पाली/निजामपूर/माणगाव (४५ किमी):
खोपोली-पाली बायपास रस्त्यावरून पाली येथे डावीकडे वळण घेऊन, बल्लाळेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या बाजूने हा रस्ता जातो. हा रस्ता डांबरी असून अत्यंत चांगल्या स्थितीत आहे. एरवी या रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी असते. परंतु गणपतीच्या दिवसात बरेच मुंबईकर या मार्गाने जाऊन थेट माणगाव येथे, माणगाव एसटी डेपोच्या अगदी समोर मुंबई-गोवा महामार्गावर येतात.
या पर्यायी मार्गाने गेल्यास पनवेल ते माणगाव या दरम्यानचा खड्डेयुक्त महामार्ग आपण टाळू शकतो. तसेच या दिवसात महामार्गावर, विशेषतः कोलाड/इंदापूर/माणगाव येथे होणारी वाहतूक कोंडी आपण टाळू शकतो.
मात्र या मार्गाने जाताना पुढील काळजी घेणे आवश्यक आहे:
१. यात ५ ते ६ प्रमुख वळणे येतात. एखादे चुकीचे वळण घेतल्यास लांबचा फेरफटका पडू शकतो. त्यामुळे गूगल मॅपचा वापर करावा. परंतु वाटेत काही ठिकाणी इंटरनेट चालत नाही. यासाठी पाली ते माणगाव या मार्गाचा गूगल मॅप आपल्या मोबाईलवर आधीच डाऊन-लोड करून ठेवणे
२. वाटेत टायर पंक्चर झाला किंवा गाडीत बिघाड झाला तर जवळपास मदत मिळणे कठीण आहे. त्यामुळे येथे प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी गाडीचे टायर इत्यादी व्यवस्थित आहेत का ते तपासणे. तसेच या मार्गावर रात्रीचा प्रवास टाळावा.
माणगाव ते पोलादपूर (४८ किमी):
हा टप्पा म्हणजे महामार्गावरील एक खूपच चांगल्या स्थितीत असलेला भाग. यातील बहुतेक रस्त्याचे उत्तम प्रकारे काँक्रीटीकरण झालेले असून त्यावर दोन्ही बाजूच्या मार्गिका चालू आहेत. लोणेरे ते वीर या छोट्याशा भागात मात्र खड्ड्यांचा सामना करावा लागू शकतो.
या भागात प्रवास करताना एका अद्ययावत आणि निसर्गसुंदर महामार्गावर प्रवास केल्याचे समाधान मिळेल.
कशेडी घाट (३४ किमी):
आपल्या मार्गातील हा सर्वात उंच, लांब आणि अवघड असा घाट. यातील बराचसा रस्ता चांगल्या स्थितीत आहे पण काही ठिकाणी मात्र खड्डे आहेत. अवघड वळणे व जड वाहनांची वर्दळ यामुळे येथे नेहमीच अत्यंत काळजीपूर्वक वाहन चालवावे लागते.
परंतु यावेळी शासनाने कशेडी बोगद्याची कोकणाकडे जाणारी मार्गिका गणेशोत्सवापुरती चालू केल्याने हा प्रवास थोडा सोपा होणार आहे.
या बोगद्यासाठी, कशेडी घाट सुरु झाल्यानंतर (म्हणजे पोलादपूर एस टी स्टँड नंतर लगेचच) काही किमी अंतर पार सध्याच्या घाट रस्त्याने पार केल्यावर डावीकडे बोगद्याकडे जाणारे वळण येते. ते वळण घेतल्यानंतर सुमारे ४ किमी पुढे गेल्यावर आपण बोगद्यात प्रवेश करतो. बोगाद्याची लांबी सुमारे २ किमी आहे. खेडच्या बाजूला बोगद्यातून बाहेर पडल्यावर आणखी सुमारे दोन किमी प्रवास केल्यानंतर, हॉटेल अनुसया जवळ, आपण मूळ मुंबई-गोवा मार्गावर येतो.
या बोगद्यामुळे कशेडी घाटातील सर्वात अवघड व धोकादायक भाग टळतो तसेच प्रवासातील सुमारे २० मिनिटे वाचतात. मात्र बोगद्यातील तसेच त्याच्या दोन्ही बाजूंच्या जोडरस्त्यांचे काही काम अजूनही सुरू आहे त्यामुळे या भागात आपले वाहन काळजीपूर्वक व सध्या दिलेली ३० किमी/तास ही वेग मर्यादा पाळून चालवावे.
हॉटेल अनुसया ते भरणा नाका (२६ किमी):
हा कोणतीही वळणे व उंच सखल भाग नसलेला महामार्गाचा सरळसोट पट्टा गेल्या एक वर्षााहूनही अधिक काळ वापरात आहे. येथे कोणतीही अडचण येऊ नये.
भोस्ते घाट/लोटे परशुराम/परशुराम घाट (३० किमी):
भरणा नाका येथे सुरू होणाऱ्या भोस्ते घाटात काँक्रीटीकरण झालेला चार पदरी मार्ग तयार आहे. लोटे परशुराम येथील मार्ग देखील चांगल्या स्थितीत आहे.
परशुराम घाटात देखील काँक्रीटीकरण झालेला चार पदरी मार्ग बहुतांशी तयार आहे. मात्र येथे वारंवार दरड/माती कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे येथे निदान एक मार्गिका तरी सुस्थितीत सुरू असेल.
चिपळूण ते सावर्डे (२१ किमी):
परशुराम घाट उतरल्या नंतर चिपळूण शहर येईपर्यंत रस्त्याची स्थिती यथातथाच आहे. बहादूर शेख नाका येथे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते परंतु तेथे परिस्थिती हाताळण्यासाठी वाहतूक पोलिस हजर असतात.
चिपळूण शहरात पुलाचे सर्व खांब उभे आहेत पण एकही गर्डर अजून बसवलेला नाही. परंतु होणाऱ्या पुलाच्या दोन्ही बाजूंचा रस्ता आता चांगल्या स्थितीत असल्याने इथे फारशी अडचण येऊ नये.
त्यानंतर कापसाळ, कामथे गाव, कामथे घाट, कोंडमळा करून सावर्डे इथपर्यंत रस्ता व्यवस्थित आहे. सावर्डे शहरात सर्व्हिस रोडचे काम अजून पूर्ण झालेले नाही. परंतु मुख्य महामार्गाचे काम पूर्ण होऊन दोन्ही बाजूंच्या मार्गिका सुरू झाल्या आहेत त्यामुळे वहाळ फाटा येथे आपल्या गावाकडे जाण्यासाठी उजवीकडे वळण घेईपर्यंत प्रवासात कोणताही अडथळा येणार नाही.
वहाळ फाटा ते तुरंबव रस्ता देखील सुस्थितीत आहे.
वरील माहिती विविध प्रसार माध्यमे, अगदी अलीकडे प्रवास केलेले आपले ग्रामस्थ/इतर परिचित, या भागात स्थाईक असलेली परिचयातील मंडळी यांच्याकडून मिळवलेल्या माहितीतून दिलेली आहे. काही ठिकाणी रस्त्याचे काम अजूनही चालू आहे. तसेच मोठा पाऊस झाला तर त्याचा परिणाम रस्त्याच्या स्थितीवर होऊ शकतो. त्याचप्रमाणे रस्त्यावरील वाहनांमध्ये बिघाड झाल्यास किंवा एखादा अपघात झाल्यास अचानक वाहतूक कोंडीची परिस्थिती उद्भवू शकते.
त्यामुळे १६ ते २० सप्टेंबर दरम्यान आपले जे ग्रामस्थ या महामार्गावर प्रवासात असतील त्यांनी रस्त्याच्या स्थितीची तसेच ट्रॅफिकची अद्ययावत माहिती माझ्या व्हॉट्स ॲप क्रमांक ९८६९१११४४४ वर पुरवल्यास आम्ही ती या ग्रुपवर सर्वांपर्यंत पोहोचवू शकू.
वरील माहिती आपल्याला उपयुक्त वाटेल अशी आशा आहे.
या काळात सर्वांचा प्रवास कोणतीही अडचण न येता सुखाचा होवो ही सदिच्छा. परंतु तरीही कोणतीही अडचण आल्यास संपर्क साधण्यासाठी आम्ही काही व्यक्तींची माहिती मिळवली आहे. त्यांची माहिती एका वेगळ्या मेसेजमध्ये पाठवत आहे.
आता या वर्षीच्या गणेशोत्सवात मुंबई ते तुरंबव या प्रवासात काही अडचण आल्यास आपण कुठे संपर्क साधू शकता याची माहिती पुढे देत आहे:
पोलादपूर ते भरणा नाका:
श्री. दीपक पंडित
मोबाईल क्र. 73032 22275
(श्री. दीपक पंडित यांचे खेड मध्ये असलेले “हॉटेल दीपक” आपल्याला माहीत असेलच. येथे उत्तम प्रतीचा नाश्ता व शाकाहारी/मांसाहारी जेवण मिळते. तसेच राहण्याची चांगली सोय आहे)
भरणा नाका ते सावर्डे:
श्री. महेश बळवंत पंडित
मोबाईल क्र. 91589 89090
सावर्डे:
श्री. दत्तात्रय श्रीराम पंडित
मोबाईल क्र. 95523 55955
वर नमूद केलेल्या भागात प्रवासात काही अडचण आल्यास आपण वरील ग्रामस्थांशी संपर्क साधू शकता. त्यांच्या माहितीतील मेकॅनिक, गॅरेज मालक, डॉक्टर इत्यादींच्या मार्फत ते आपल्याला मदत करू शकतील.
वरील ग्रामस्थांशी आम्ही व्यक्तिशः बोललो आहोत. त्यांनी आवर्जून सांगितले आहे की आपल्या कोणाही ग्रामस्थांना प्रवासात काही अडचण आली तर त्यांना मदत करण्यात आनंदच होईल.
याशिवाय इतर काही कार मेकॅनिक/टोइंग व्हॅन यांची माहिती पुढे देत आहे:
१. अक्षय किळजे, वालोपे
पेट्रोल/डिझेल वाहन मेकॅनिक
मो. 80978 68935
२. आशीष किळजे, वालोपे
पेट्रोल/डिझेल वाहन मेकॅनिक
मो. 90491 95365
३. किरण वीर, कामथे
कार मेकॅनिक
मो. 70304 22950
४. श्री. महाडिक, खेर्डी
कार मेकॅनिक
मो. 99224 40006
५. अभिजीत आंब्रे, चिपळूण
टोविंग व्हॅन
मो. 88889 83977
याव्यतिरिक्त पनवेल ते पोलादपूर या भागात मदतीसाठी काही संपर्क क्रमांक मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. अशी माहिती उपलब्ध झाल्यास आम्ही आपल्याला नक्की कळवू.
तसेच वर दिलेल्या कोणत्याही व्यक्तींशी काही कारणाने संपर्क होत नसेल तर माझ्या पुढील पैकी कोणत्याही क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता:
मो. 98691 11444
मो. 93244 68664
आपला प्रवास कोणतेही विघ्न न येता पार पडो हीच श्री शारदा देवी चरणी प्रार्थना. परंतु न जाणो काही अडचण आलीच तर आम्ही दिलेल्या माहितीचा आपणाला उपयोग होईल यासाठीच आमचा हा एक छोटासा प्रयत्न.
याशिवाय, मंडळाची २०२३ सालाची दिनदर्शिका प्रसिद्ध करताना आम्ही त्यात गावच्या ठिकाणी स्थाईक असलेल्या विविध व्यावसायिकांची माहिती (नाव व मोबाईल क्रमांक) दिली होती. ही माहिती सोबत जोडत आहोत.
तुरंबव येथील मुक्कामात गरज पडल्यास आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता.
गणपती बाप्पा मोरया🙏🙏🙏
आपला नम्र,
प्रमोद अमृतराव पंडित
अध्यक्ष,
श्री शारदा समाज सेवा मंडळ