कोकणला निसर्गाने भरभरून दिले आहे. येथील मंदिरे विशेष ठरली आहेत. पुरातन वास्तुरचनेचा ठेवा हे येथील मंदिरांचे वैशिष्टय आहे. विद्येची देवता असणा-या श्रीदेवी शारदेचे मंदिर चिपळूण तालुक्यात तुरंबव येथे आहे. विशेष म्हणजे संपूर्ण कोकणपट्टीतील हे एकमेव शारदा मंदिर आहे.
नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी देवी म्हणून ओळख असलेल्या श्री शारदा देवीच्या नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. सध्याच्या आधुनिकतेच्या युगात व तरुणाईचे आकर्षण असलेल्या डिस्को दांडियाच्या काळातही येथील नवरात्रोत्सव गेल्या काही शतकांपासूनचे आपले वेगळेपण टिकवून आहे. संतती प्राप्तीच्या नवसाला पावणारी देवी असा लौकिक असणा-या या शारदा देवीच्या उत्सवाला अवघ्या महाराष्ट्रातील भाविक आवर्जून उपस्थिती लावतात.
तुरंबव येथे भव्य असे राजस्थानी पद्धतीने श्री शारदा देवीचे मंदिर आकर्षण ठरले आहे. मंदिराच्या पूर्व बाजूस सखल भागात दाट वनराई व तिन्ही बाजूंनी डोंगराने वेढलेले आहे. मंदिरात नक्षीकाम कोरलेल्या संगमरवरी दगडांचा वापर करण्यात आला आहे. मंदिराच्या मध्यभागी घुमटाकार चौथरा असून, त्यावर ग्रामदेवता श्री देवी वरदायिनी, श्री देवी मानाई, श्री देवी चंडिका यांच्या मूर्तीसह त्यांच्या मध्यभागी श्री शारदा देवीची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली आहे. गाभा-यासमोरील चौकटीत बसून सर्व प्रतिमांचे जवळून दर्शन होते. येथील प्रथेनुसार मंदिरातील मूर्तीच्या दैनंदिन पूजाअर्चेचा मान याच गावचे स्थानिक गुरव गावकर यांच्याकडे आहे. दररोज सांज आरती होते.
नवरात्रात येथे दिमाखदार उत्सव साजरा केला जातो. नऊ दिवस येथे यात्रा भरते. नवरात्रातील पहिले दोन दिवस देवीचा जागर म्हणून जाखडी नृत्य, भजन, दिंडी आदी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तिस-या दिवसापासून ‘गौराईचा नवस’ कार्यक्रमाला प्रारंभ होतो. सकाळी आठ वाजल्यापासून दर्शन व देवीची ओटी भरणे असे कार्यक्रम असतात. यानंतर दीपारत्यांचे नृत्य व जाखडी नृत्यास सुरूवात होते. या नृत्यासाठी विशिष्ट प्रकारचा पेहराव करणे ही येथील पारंपरिक पद्धत आहे. विशिष्ट प्रकारचे धोतर, कमरेला रंगीत शेला, डोक्यावर मराठेशाही पगडी, पायात चाळ असा गणवेश परिधान करून सर्व ग्रामस्थ मानकरी नृत्यात सहभागी होतात. या नृत्यानंतर रात्री नवसाचा कार्यक्रम सुरू होतो, तो पहाटेपर्यंत चालतो. प्रत्यक्ष अपत्य प्राप्तीनंतर नवस फेडताना विविध वयोगटातील बालकांना त्यांचे नातलग देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी या नवरात्रीत घेऊन येतात. हा कार्यक्रम सुरू असताना ढोल, वाजंत्री व घंटाच्या निनादात मंदिर परिसरातील वातावरण भक्तांना मंत्रमुग्ध करणारे असते.
विजयादशमीच्या दिवशी सोने लुटणे हा सोहळा उत्साहात साजरा केला जातो. घरोघरी नऊ दिवस रूजवलेले धान्य (रोव) स्नेहभावाने एकमेकांना दिले जातात. दुस-या दिवशी एकादशीला पहाटे जमवलेले नवधान्यांचे भक्तांना वाटप केले जाते. भक्तगण हा हुरडा धान्यवृद्धीच्या श्रद्धेने घरातील धान्यात मिसळतात. यानंतर सकाळी दहाच्या सुमारास सा-यांना प्रसाद वाटून या वैशिष्टयपूर्ण उत्सवाची सांगता होते.
श्री शारदेच्या दर्शनाला असे यावे
चिपळूण तालुक्यातील तुरंबव येथे प्रसिद्ध असे श्री शारदा देवीचे मंदिर आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील सावर्डे गावापासून सुमारे १२ कि.मी. अंतरावर हे मंदिर आहे. चिपळूण मध्यवर्ती एस.टी. स्थानकातून दिवसभरात तुरंबवकडे जाणा-या एस.टी.च्या गाडया आहेत. तर रात्रीच्यावेळी जाण्यासाठीदेखील चिपळूण आगारातून एस.टी.च्या जादा गाडया सोडण्यात आल्या आहेत. तर तुरंबव येथून परतण्यासाठीही गाडयांची व्यवस्था आहे. सावर्डे येथून तसेच वहाळ फाटा येथून खासगी वाहने उपलब्ध असतात.
Reference: prahaar.in